• १७ ऑगस्टपासून उड्डाणे बंद ; २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बुकिंग उपलब्ध
  • स्टार एअरकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप नाही

बेळगाव : बेळगाव आणि मुंबईदरम्यान विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टार एअरची बेळगाव-मुंबई विमानसेवा १७ ऑगस्टपासून तात्पुरती बंद होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अधिकृत बुकिंग व्यवस्थेत १६ ऑगस्टपर्यंतच या मार्गावरील उड्डाणे उपलब्ध असून, १७ ऑगस्टपासून बुकिंग दिसत नाही. मात्र, २५ ऑक्टोबरपासून पुन्हा तिकिटांचे बुकिंग उपलब्ध असल्याने सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

बेळगाव विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी ही सेवा व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अचानक बुकिंग बंद झाल्याने आगामी काळात मुंबईला जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  • २५ ऑक्टोबरपासून सकाळी विमानसेवा :

सध्याच्या बुकिंग वेळापत्रकानुसार, २५ ऑक्टोबरपासून बेळगावहून सकाळी ७.२० वाजता विमानाचे उड्डाण होऊन ते सकाळी ८.२५ वाजता मुंबईत पोहोचणार असल्याचे दिसत आहे. इकॉनॉमी क्लासचे प्रारंभिक भाडे सुमारे ६,४०० रुपये असल्याचे बुकिंग प्रणालीत दर्शविण्यात आले आहे.

  • बेळगाव – अहमदाबाद सेवेतही बदल :

स्टार एअरच्या बेळगाव-अहमदाबाद विमानसेवेच्या वेळापत्रकातही बदल झाल्याचे दिसून येत आहे. २५ ऑक्टोबरपासून बेळगावहून सकाळी ७.४५ वाजता विमान सुटून सकाळी ९.२५ वाजता अहमदाबादला पोहोचणार असल्याचे बुकिंगमध्ये नमूद आहे. मात्र, २५ ऑक्टोबरपूर्वी या मार्गावरील बुकिंग सध्या उपलब्ध नसल्याचे दिसते.

  • दोन महिन्यांहून अधिक काळ सेवा बंद राहणार?

सध्याच्या बुकिंग माहितीनुसार, १७ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव-मुंबई विमानसेवा उपलब्ध राहणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या काळात मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी विमानसेवा तसेच रेल्वे किंवा बसचा पर्याय निवडावा लागू शकतो.

दरम्यान, २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बुकिंग उपलब्ध असल्याने सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, सेवा तात्पुरती बंद करण्यामागचे कारण आणि २५ ऑक्टोबरपासून ती निश्चितपणे सुरू होणार आहे का, याबाबत स्टार एअरकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे अद्याप बाकी आहे.