• मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

गर्लगुंजी येथील मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य हणमंत मेलगे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच एसडीएमसी सदस्य संजय पाटील आणि मऱ्यापा पाखरे यांनी मराठी शाळा टिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन होईल. त्यामुळे शाळांच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्या लक्ष्मी पाटील, मार्केटिंग सोसायटी नंदगडचे गोपाळराव पाटील, तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, एसडीएमसी सदस्य संजय पाटील, मऱ्यापा पाखरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, माउली सोसायटीचे सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कुंभार, शिवाजी कोलकार, सुरेश मेलगे, संतोष पाटील, गोकुल चौगुले यांच्यासह शाळेचे एसडीएमसी सदस्य व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

यानंतर युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सिंगीनकोप येथील मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम युवा समितीच्या माध्यमातून राबविला जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आदित्य कांबळे, शुभम कांबळे आणि श्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. पत्रकार सुहास पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरचे श्री पाटील, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, सुदेश घाडी, मुकेश गुरव, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई, तन्मय हुंदरे, श्रेयस निटूरकर आणि आकाश घाडी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.