- उद्यमबाग पोलिसांची कारवाई
- ६ किलो ८५८ ग्रॅम गांजामिश्रित चॉकलेट जप्त
बेळगाव : गांजामिश्रित अंमली पदार्थांच्या चॉकलेट पाकिटांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित चॉकलेट पाकिटे, मोबाईल, रोख रक्कम आणि स्कूटी असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलू पिता जित्ताल प्रजापती (वय ३९, रा. हनुमाननगर, बेळगाव ; मूळ रा. चम्रुपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील के.एल.ई. इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यालगत गांजामिश्रित चॉकलेट पाकिटांची विक्री करत होता.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईत ५४ हजार रुपये किमतीची ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित अंमली पदार्थांची २७ चॉकलेट पाकिटे जप्त करण्यात आली. याशिवाय १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, ६०० रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीची स्कूटी असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २०(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी, पीएसआय प्रविण बिरादार, पीएसआय यू. बी. कट्टीकर यांच्यासह के. के. सवदत्ती, उदयकांत मासन्नवर, महेश सिद्धप्पा वडेर, ईरण्णा चवलगी, हनमंत सीतिमनी, राजशेखर बी. मदिहळ्ळी आणि महिला पोलीस कर्मचारी दीपा अनंतपूर यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.








