- ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
बेळगाव : गांधीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर झालेल्या अपघातात एका अज्ञात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकडे सहकार्याची विनंती केली आहे.
माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी पहाटे हलगा येथून काकतीच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना मल्लेशप्पा यांच्या दुचाकीची गांधीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका अज्ञात वृद्धाला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार मल्लेशप्पा जखमी झाले, तर गंभीर दुखापत झालेल्या अज्ञात वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ६० ते ६५ वर्षे असून त्यांचा चेहरा लांबट, रंग गव्हाळ, नाक जाड आणि डोक्यावर सुमारे एक इंच लांबीचे काळे-पांढरे केस आहेत. त्यांच्या अंगात मरून रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची नायलॉनची पॅन्ट होती. तसेच त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर पूर्वी शस्त्रक्रिया झालेली असून मनगटाचा भाग नसल्याची महत्त्वाची ओळखही पोलिसांनी नमूद केली आहे.
सध्या मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या व्यक्तीची ओळख पटत असल्यास किंवा त्यांचे नातेवाईक, वारसदार यांची माहिती असल्यास उत्तर वाहतूक पोलीस ठाणे (०८३१-२४०५२४० / ९४८०८०४१०३) किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०८३१-२४०५२७८) येथे तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








