- मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी मराठी भाषा आणि मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करत, “मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.
माजी ग्रामपंचायत सदस्या तथा सीए पद्मश्री पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या उपक्रमाचे आणि युवा कार्यकर्त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
युवा समितीतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मराठी शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गणपती मुतगेकर, उपाध्यक्ष गजानन पाटील, सदस्य शंकर पाटील, सारंग पाटील, विश्वनाथ बुवाजी, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, भाऊ पाटील, निळकंठ मुतगेकर, गोविंद पाटील, मुख्याध्यापिका वंदना पाटील, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे श्री. पाटील, शुभम कांबळे, लक्ष्मण भातकांडे, सुदेश घाडी, परशुराम पाटील, मुकेश गुरव, आदित्य कांबळे, साईनाथ मळीक, कृष्णा खांबळे, श्रीहरी पाटील, तुषार देसाई आणि प्रज्योत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.








