- मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार
खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवा समितीच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक २५ जुलै रोजी इदलहोंड आणि गणेबैल मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना अकलिपी, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीतर्फे दानशूरांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात आहे. सीमाभागातील मराठी शाळा सक्षम करण्यासाठी पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी युवा समितीच्या वतीने करण्यात आले.

इदलहोंड मराठी प्राथमिक शाळा : कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. खानापूर युवा समितीचे सहकारी मुकेश गुरव यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व्यंकटेश पाटील सदस्य सागर पाटील, बाळाराम चोपडे तसेच उपस्थितांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले.
गणेबैल मराठी प्राथमिक शाळा : शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी खानापूर युवा समितीचे सहकारी शुभम कांबळे, प्रसन्न पाटील यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सागर कवठणकर आणि उपस्थितांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले.
सदर दोन्ही कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, गावातील नागरिक तसेच खानापूर युवा समितीचे सहकारी श्री पाटील, साईनाथ मळीक, तुषार देसाई, कृष्णा खांबले आदी उपस्थित होते.







