- महापालिकेच्या आश्वासनानंतरही दुरुस्तीला मुहूर्त नाही
बेळगाव : शहरातील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलालगत आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
न्यू गुड्स शेड मार्ग हा शहरातील महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता असून, दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि शालेय वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र, एल अँड टी कंपनीच्या कामानंतर रस्त्याची झालेली दुरवस्था अद्यापही कायम असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या कडेला चिखल साचल्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वी उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना आता पावसाळ्यात चिखल आणि पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. अलीकडेच समाजसेवक गणेश दड्डीकर आणि परिसरातील नागरिकांनी निवेदन सादर केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार १५ जून रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली होती. त्या वेळी रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे आश्वासनही देण्यात आले होते.
मात्र, पाहणी होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते प्रशासनाचे काम मर्यादित न ठेवता या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूंना पक्क्या गटारी उभाराव्यात, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.








