- मतदार यादीत नाव नसलेल्यांनी तातडीने नोंदणी करावी ; नागरिकांना काँग्रेसचे आवाहन
बेळगाव : राज्य सरकारच्या एन.एस.आय.आर. नोंदणी मोहिमेचा लाभ घेत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन केपीसीसीच्या कित्तूर कर्नाटक प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. मतदार नोंदणीमुळे मतदानाचा अधिकार अबाधित राहण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या डिजिटल मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी करावी. स्थानिक स्तरावर संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यास थेट तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
मतदानाचा अधिकार सुरक्षित राखण्यासाठी मतदार नोंदणी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी केंद्र सरकारच्या काही धोरणांवर टीकाही केली. राज्य सरकारच्या पाचही गॅरंटी योजनांचा लाभ आणि संबंधित आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, विविध ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.








