• सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास सुरू

बेळगाव : शहरातील खडेबाजार परिसरातील एका दागिन्यांच्या दुकानात पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे दोन तासांनी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने दुकानाच्या समोरील भागातील काही साहित्य चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेण्यात आला आहे.

या घटनेनंतर खडेबाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.