बेळगाव : भूतान येथे झालेल्या १६व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देशाचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल करणारे आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रशांत खन्नूकर यांचा श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते प्रशांत खन्नूकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भूतानमध्ये झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक मिळवत प्रशांत खन्नूकर यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी रमाकांत कोंडुसकर म्हणाले, बेळगावच्या मातीने देशाला अनेक कर्तृत्ववान खेळाडू दिले आहेत. प्रशांत खन्नूकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि खेळाप्रती असलेले समर्पण यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या संघर्षाची आणि मेहनतीची योग्य दखल असून त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल.

सत्काराला उपस्थित मान्यवरांनी प्रशांत खन्नूकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.