• विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
  • ३५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

बेळगाव : क्रीडा स्पर्धा केवळ विजय-पराभवापुरत्या मर्यादित नसून त्या खेळाडूंमध्ये शिस्त, जिद्द, आत्मविश्वास आणि संघभावना रुजविण्याचे प्रभावी माध्यम आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे आवाहन एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय ज्युडोपटू तथा प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांनी केले.

नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा, अनगोळ यांच्या आयोजनाखाली आणि विद्याभारती कर्नाटकच्या सहकार्याने आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी लैला साखर कारखान्याचे संचालक सदानंद पाटील, विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जनकल्याण ट्रस्टचे विश्वस्त अशोक शिंत्रे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, जिल्हा सचिव एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी तसेच विद्याभारतीचे जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, समर्थ पानारी, श्रेयस किल्लेकर, यश हळसीकर, भावना बेर्डे, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर आणि मेघा कलखांबकर या खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती प्रदक्षिणा घालून मान्यवरांकडे सुपूर्द केली. खेळाडू चंदन आणि श्रेयस यांनी सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर ओमकार, सरस्वती आणि भारतमाता प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील संधी, मेहनतीचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण सरावाचे मूल्य याविषयी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत संत मीरा (अनगोळ), संत मीरा (गणेशपूर), शांतिनिकेतन पब्लिक स्कूल (खानापूर), स्वामी विवेकानंद स्कूल (खानापूर), देवेंद्र जीनगौडा स्कूल (शिंदोळी), हनिवेल स्कूल (खानापूर) आणि ज्ञान प्रबोधनी स्कूल (रामदुर्ग) येथील ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

यावेळी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, ओंकार गावडे, श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, स्वाती सावंत, गंगा गाणीकोप्प, हर्ष रेडेकर, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, सोहेल विजापूरे, सृष्टी भोंगळे, संभवी स्वामी, प्रतीक एच., बसवंत पाटील, शामल दड्डीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी यांनी, तर आभार प्रदर्शन प्रेमा मेलिनमनी यांनी केले.