- बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन
चंदगड : बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजाही प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील, असा दावा शिष्टमंडळाने केला आहे.
बेळगावच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठा लक्षात घेऊन या योजनेचा गांभीर्याने विचार करून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.








