- १६ व्या वर्षी पायी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो वारकरी सहभागी
येळ्ळूर : आषाढी वारीनिमित्त येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या वतीने पंढरपूरकडे निघालेली पारंपरिक पायी दिंडी दुसऱ्या दिवशीही अभंग, टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरकली. गेली १५ वर्षे अखंड सुरू असलेली ही दिंडी यंदा १६ व्या वर्षात प्रवेश करत असून, शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धामणे येथील हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. वैष्णव सदन आश्रमात विधीवत पादुका पूजनानंतर भव्य मिरवणुकीने यात्रेला प्रारंभ झाला. ९० वर्षांवरील ज्येष्ठ वारकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत विविध वयोगटातील भाविकांनी पायी वारीत सहभाग नोंदविला.
यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी दिंडीची भेट घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच उत्तम पिकपाण्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी वारकऱ्यांना केली. दरवर्षी दिंडीत सहभागी होणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे ही आपल्या कुटुंबाची परंपरा असल्याचे सांगत, पुढील वर्षी स्वतःही पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
गतवर्षी दिंडीच्या वाहनांना महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्या सहकार्याने दिंडीच्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर सुलभ आणि टोलमुक्त प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या सहकार्याबद्दल दिंडी समितीने हेब्बाळकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले.








