- २० लिटर तस्करीची दारू जप्त
- उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात तस्करीची दारू जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
होलेप्पा लक्ष्मण हूजेरी (वय ४०, रा. मुतनाळ रोड, ता. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शिंदोळी – मुतनाळ मार्गालगत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी अवैधपणे मद्यविक्री करत असल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करून मारिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय एम. एस. रुद्रापूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाई दरम्यान आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात आरोपीकडून पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये साठवून ठेवलेली सुमारे २० लिटर तस्करीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध मद्यविक्रीविरोधात प्रभावी कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मारिहाळ पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.








