- मारिहाळ पोलिसांची कारवाई : सीसीटीव्ही ठरले निर्णायक
बेळगाव : बेळगाव-गोकाक मार्गावरील भीषण हिट अँड रन प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावत अपघातास कारणीभूत ठरलेल्या टिप्परसह चालकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
१ जुलै रोजी सकाळी चंदगड येथील राजू रामा अष्टेकर (वय ४६) हे मुच्चंडी गावाजवळील फळांच्या दुकानासमोरून पायी जात असताना भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या भीषण अपघातात अष्टेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताच्या नातेवाईक लक्ष्मीबाई गंगाप्पा कुकडोळी (रा. लक्ष्मीगल्ली, सुळेभावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली. त्यामध्ये पोपटी रंगाचे इंजिन आणि लाल रंगाची बॉडी असलेला KA-22/B-1610 क्रमांकाचा टिप्पर अपघातास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून खानापूर तालुक्यातील प्रभुनगर येथील रहिवासी व सध्या कणबर्गी येथे वास्तव्यास असलेल्या टिप्पर चालक आदृश्यप्पा गंगाय्या मास्तमर्डी याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वैज्ञानिक तपासपद्धती, सीसीटीव्ही विश्लेषण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या मारिहाळ पोलीस पथकाचे शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.








