बेळगाव : येथील सीमाभागात मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने कवी कालिदास दिन निमित्त “कवितेचे मर्म, वर्म आणि धर्म” या विषयावरील विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते व मार्गदर्शक डॉ. उमेश कळेकर हे स्वतःच्या निवडक कवितांचे सादरीकरण करणार असून, त्या कवितांमागील आशय, काव्यदृष्टी आणि सर्जनप्रक्रियेचा उलगडा करणार आहेत. काव्यरसिकांसाठी हा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी साहित्यिक अनुभव ठरणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
परिचय : डॉ. उमेश दत्त कळेकर हे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय सेवा, साहित्य, संगीत आणि भारतीय संस्कृती या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘फिनिक्स’ या कवितासंग्रहासाठी त्यांना स्व. शांता शेळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, विविध साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी व अध्यक्ष म्हणून त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या प्रभावी काव्यवाचन, व्याख्यानांमुळे आणि साहित्यसेवेमुळे ते मराठी साहित्यविश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
या कार्यक्रमास मराठी रसिक, कवी, साहित्यिक तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.








