- सहा दिवसांत ७८.६ मिमी पावसाची नोंद
- १ जूनपासून १८२.६ मिमी पाऊस; सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक
- वादळी वाऱ्याने झाडे कोसळून नुकसान
बेळगाव : रविवारी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पावसाने बेळगाव शहरासह जिल्हाभर जोरदार पुनरागमन केले. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने अनेक भागांत पाणी साचले असून, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत जिल्ह्यात ७८.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत १३४ टक्के आहे. गेल्या दोन दिवसांतील संततधार पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ६ जुलैदरम्यान बेळगाव जिल्ह्यात १८२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद १७९.५ मिमी या सरासरीच्या तुलनेत दोन टक्के अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








