• रेल्वे रुळांवर प्रवेश केल्याप्रकरणी १६ हजारांचा दंड
  • पावसाळ्यात निर्बंधांचे पालन करण्याचे रेल्वेचे आवाहन

हुबळी : सार्वजनिक सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून दूधसागर धबधब्याकडे रेल्वे रुळांलगत बेकायदेशीर ट्रेकिंग करणाऱ्या ३२ पर्यटकांवर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) कारवाई करत एकूण १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रविवारी विशेष वीकेंड मोहिमेदरम्यान कॅसल रॉक आरपीएफच्या विशेष पथकाने दूधसागर आणि सोनालियम रेल्वे स्थानकांदरम्यान अचानक तपासणी केली. यावेळी जंगलातून रेल्वे रुळांवर अतिक्रमण करून धबधब्याकडे जाणारे ३२ पर्यटक आढळून आले. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या (जन विश्वास कायदा) कलम १४७ अंतर्गत कारवाई करून प्रत्येकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दक्षिण पश्चिम रेल्वेने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेमार्गे दूधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, पावसाळ्यात काही पर्यटक बेकायदेशीरपणे जंगलातून रेल्वे रुळांवर प्रवेश करत असल्याने त्यांच्या जीविताला तसेच रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावी आणि वास्को येथील आरपीएफकडून दूधसागर परिसरात विशेष निगराणी वाढविण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यटकांना रेल्वे रुळांवर किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश न करण्याचे तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.