- जामगाव येथे झाड कोसळून वीज खांब व वाहिन्यांचे नुकसान
- दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित
खानापूर : तालुक्यातील जामगाव येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड विजेच्या खांबांवर आणि वीजवाहिन्यांवर कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारात असून, हेस्कॉमच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळे झाड उन्मळून पडल्याने विजेचे खांब तुटले आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र, दोन दिवस उलटूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तुटलेले वीज खांब आणि वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच अशा घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी जामगावच्या नागरिकांनी केली आहे.








