• पदपथावरील १० हून अधिक अनधिकृत शेड हटवले

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने सोमवारी अनगोळ मुख्य रस्त्यावरील पदपथ आणि नाल्यांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड व दुकानांवर कारवाई करत १० हून अधिक अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांसाठी सार्वजनिक मार्ग पुन्हा मोकळा करण्यात आला.

अनगोळ मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी पदपथ आणि नाल्यांवर पत्र्याची शेड व दुकाने उभारल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याशिवाय वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. नागरिकांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटवली.

याबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागांमध्ये आठवड्यागणिक कृती आराखडा तयार करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अनगोळनंतर पुढील आठवड्यात खानापूर रोड परिसरातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

पदपथ आणि रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी निर्माण करण्यात आले असून त्यांचा वापर मूळ उद्देशासाठीच व्हावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. व्यापारी व नागरिकांनी स्वखुशीने अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महापालिका कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या कारवाईवेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.