- रिमझिम पावसात सुवासिनींनी जपली परंपरा
- पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा
- तीन पिढ्यांनी एकत्र साजरा केला सण
बेळगाव : शहर आणि परिसरात सोमवारी वटपौर्णिमा (वटसावित्री व्रत) मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. रिमझिम पावसाची हजेरी असूनही सुवासिनींनी पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी वटवृक्षाचे विधिवत पूजन करून परंपरा जपली.
सकाळपासूनच शहरातील प्रमुख मंदिरे, उद्याने तसेच विविध भागांतील वटवृक्षांजवळ महिलांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि पूजेचे साहित्य घेऊन आलेल्या सुवासिनींनी वडाच्या झाडाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर सत्यवान-सावित्रीच्या कथांचे वाचन व श्रवण करत धार्मिक विधी पार पाडले.
पूजनानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावत फळे, आंब्याचे वाण आणि ओटीचे साहित्य देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. अनेक महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभावा, या भावनेने व्रत केल्याचे सांगितले. काहींनी हिंदू संस्कृतीतील परंपरा आणि पूर्वापार चालत आलेले रितीरिवाज जपण्यासाठी हे व्रत करत असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी काही महिलांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत पती-पत्नींमधील सामंजस्याचे महत्त्वही अधोरेखित केले. समाजात अनेक नाती संवादाअभावी तुटत असल्याचे नमूद करत परस्पर समजूतदारपणा, विश्वास आणि सहकार्याच्या बळावर वैवाहिक नाते अधिक दृढ ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वटपौर्णिमेनिमित्त काही महिला आपल्या पतींसमवेत पूजेसाठी उपस्थित होत्या, तर अनेक ठिकाणी आजी, आई, सासू आणि सून अशा तीन पिढ्या एकत्रितपणे वटवृक्षाचे पूजन करताना दिसल्या. रिमझिम पावसातही श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक संस्कारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने शहरातील धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले.








