
- ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांचे प्रतिपादन
बेळगाव : कविता म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसतो. कविता लिहिणे सोपे नसून ती एक जोखीम असते. आपण जे पाहतो, अनुभवतो, ते कवितेत यायला हवे. कवितेतून मूल्यांची जोपासना करत चांगला आशय मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांनी केले.
येथील शब्दगंध कविमंडळाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २८) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते.
प्रारंभी मराठी विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले. बसवंत शहापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर सुभाष ओउळकर यांचे उद्घाटनपर भाषण झाले.
पुढे बोलताना विजय चोरमारे म्हणाले, जन्मापासूनच कविता आपल्या सोबत असते. त्यामुळे कविता आणि जगणे यांचा अतूट संबंध आहे. चांगली कविता लिहिण्यासाठी चांगले वाचक निर्माण होणे गरजेचे आहे. कविता लिहिण्यासाठी सर्वप्रथम वाचन वाढविण्याची आवश्यकता आहे. चांगली कविता लयीत नसून आशयात असते. आपल्या कवितेचे समीक्षक आपणच व्हायला हवे. कवितेचा केवळ रतीब घालण्यात अर्थ नसून ती कविता नेमका कोणता विचार देते, हे अधिक महत्त्वाचे आहे. कवींनी स्वतःचा स्वतःशी संवाद साधला पाहिजे. यातून चांगली कविता निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार होते. टाळ्यांच्या मोहात अडकलेला कवी संपून जातो. कविता ही एक कलाकृती आहे, याचे भान ठेवून कवीने लेखन करावे.

यावेळी कवी अजय कांडर यांची मुलाखत सुधाकर गावडे आणि उर्मिला शहा यांनी घेतली. यावेळी कवी कांडर म्हणाले, “जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा मरताच संस्कृती नष्ट होते. भाषा वाचविण्याचे काम संस्कृती करते. कवितेतून वैश्विक विचार मांडण्याची गरज आहे. कवीने माणूस म्हणून लिखाण करावे. विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे. आतून हुंकार द्यावासा वाटणे, हीच कविता असते. विचारांची बांधिलकी असेल तर तुम्ही कविता लिहू शकता. सातत्याने लिहिल्याने स्वतःची चिकित्सा करता येते. कवितेची समज कशी वाढवावी, यासाठी काव्यलेखन कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरते.”

कार्यशाळेस प्रा. सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेणसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, कणकवलीचे कवी सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर, स्मिता पाटील आदींसह मोठ्या संख्येने कवी, अभ्यासक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यशाळेला कवींचा उदंड प्रतिसाद लाभला. गुरुनाथ किरमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले.








