• आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
  • अथणी तालुक्याच्या कटगेरी गावातील घटना

अथणी : विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका पतीने झोपलेल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील कटगेरी गावात रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मृत महिलेची ओळख शोभा परगोंडा सारवाड अशी झाली आहे. आरोपी परगोंडा सारवाड याने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली. हे दाम्पत्य मूळचे अथणी तालुक्यातील खवटखोप्प गावचे रहिवासी असून रोजगारानिमित्त काही काळापासून अवजीकर मठात वास्तव्यास होते. शोभा या मठात स्वयंपाकी म्हणून, तर परगोंडा चालक म्हणून कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून तसेच पत्नीवर संशय घेतल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच संशयातून आरोपीने झोपलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कटगेरी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अथणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.