- मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा विस्तार ; कागदपत्रांची तपासणी सुरू
चिक्कोडी : उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक पाऊल पुढे टाकत चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असलेल्या काही व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बेळगाव शहरातील बसव कॉलनी परिसरातील विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची छाननी सुरू केली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत असून, यापूर्वी अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणीही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सध्याची छापेमारी तपासाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत ईडीकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नसून, तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








