- किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
बेंगळुरू : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विशेषतः किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विविध स्तरांवर सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किनारपट्टी भागात व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांमध्ये आठवडाभर पावसाचा जोर कायम राहू शकतो. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, २७ ते २९ जूनदरम्यान यलो अलर्ट लागू राहणार आहे.
दरम्यान, २४ ते २९ जून या कालावधीत बेंगळुरूसह म्हैसूर, कोडगू, हसन, चिक्कमंगळुरू, मंड्या, रामनगर, चामराजनगर, तुमकूर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग आणि दावणगेरे जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बिदर, कलबुर्गी, बागलकोट, यादगीर, बळ्ळारी आणि विजयनगर या जिल्ह्यांसाठी २४ ते २६ जून या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








