- बेळगावात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय
बेळगाव : जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि घटलेली पाण्याची पातळी यामुळे अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत शहरातील येडियुरप्पा मार्गावर पाईपलाईनच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र समोर आले असून, यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा मार्गावरील पाईपलाईनमध्ये साचलेली हवा बाहेर काढण्याचे काम सुरू असताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी, हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेले. सध्या अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, पाण्याच्या टँकरवर आणि बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी प्रशासनाच्या देखरेखीअभावी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट द्यावी, पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी आणि कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








