- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी
बेळगाव : शहरातील शहापूर येथील नाथ पै सर्कल परिसरात ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालवत असलेला गणेश नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
हा अपघात दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








