- सहा आरोपींना अटक
बेळगाव : जिल्ह्यातील संकेश्वर शहरात घडलेल्या बाबू भुसगोळ हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या प्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेश्वरमधील गोरक्षणमाळ परिसरात पूर्वीपासून असलेले वैमनस्य आणि नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादातून बाबू भुसगोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तीक्ष्ण हत्यारे आणि दगडांचा वापर करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताच्या पत्नीने संकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत शुभम बिसूरे, अक्षय मरडी, पवन मरडी, अनिल मरडी, संदीप मरडी आणि अभिषेक अलदाळे या सहा जणांना अटक केली.
पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपती कोंगणोळ्ळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्या प्रकरणाचा अल्पावधीत छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.








