बेळगाव : शहरातील एपीएमसी भाजी मार्केट परिसरात रविवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून परिसरातच वावरत होती. ती रिकाम्या बाटल्या गोळा करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच रात्रीच्या वेळी ती मार्केट परिसरातच मुक्काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
रविवारी सकाळी बाजारातील एका बंद दुकानासमोर संबंधित व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.








