बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे फादर्स डे मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एस. एम. सी. कमिटीचे चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रा. श्री. नितीन घोरपडे, ॲडव्हायजरी डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील तसेच उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी एकत्रित सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी, गीतांनी तसेच आकर्षक रॅम्प वॉकने उपस्थितांची मने जिंकली. वडील आणि मुलांच्या स्नेहबंधाचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांमुळे सभागृहात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनीही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे कुटुंबातील नाती अधिक दृढ होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आनंदी वातावरणात झाली.







