- शस्त्रांसह संशयित ताब्यात ; अवैध दारू जप्त
बेळगाव : शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष गुन्हेगारी नियंत्रण पथकाकडून विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्याबरोबरच अवैध दारू विक्रीविरोधातही कारवाई करण्यात आली.
डीसीपी नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताशिलदार गल्ली आणि भांदूर गल्ली येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. एका ठिकाणी गौरांग उर्फ गौरव जगन्नाथ गेंजी याच्या घरातून दोन तलवारी आणि दोन वाघनखे हस्तगत करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत श्रीधर उर्फ सिद्धू दिलीप गेंजी याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पीएसआय हुसेनसाब केरूर आणि पीएसआय मणिकंठ पुजारी यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात आर्म्स ॲक्ट तसेच कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ येथील विद्यानगर परिसरात पीएसआय विश्वनाथ घंटामठ यांच्या पथकाने श्रवण संतोष शिर्वेकर याला दुचाकीवरून कोयता आणि लोखंडी सायकल चेन वाहून नेत असताना पकडले. त्याच्याकडून संबंधित साहित्य जप्त करून पुढील कारवाई करण्यात आली.
याशिवाय, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्तवाड रस्त्यावर हातात तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या हसनसाब गौसमोद्दीन मुल्ला याला पीएसआय अविनाश ए. वाय. यांच्या पथकाने अटक केली.
या विशेष मोहिमेदरम्यान बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदीहळ्ळी गावातील जाधव गल्ली परिसरात छापा टाकून बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या देवप्पा बाळप्पा लोकुरे (वय ५०) याला अटक केली. त्याच्याकडून ३ हजार ४६५ रुपये किमतीची सुमारे ५.६७० लिटर दारू जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरोधात अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.








