• अंमली पदार्थ आणि दुचाकी जप्त

बेळगाव : बेळगाव शहरातील जुन्या बाजारपेठ भागात हेरॉईनची विक्री करणाऱ्या तिघांना मार्केट पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह दुचाकीही जप्त करण्यात आली असून आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सत्यम सुहास हुद्दार, इर्शादअहमद सलाउद्दीन तहसीलदार आणि सिद्धार्थ दत्ता कदम अशी आहेत. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींकडून हेरॉईनसह दुचाकी जप्त करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.

याच दरम्यान, दुसऱ्या कारवाईत रूपम टॉकीज परिसरातून सृजल कृष्णनाथ पाटील या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याचे दोन साथीदार कृष्णा घोडसे आणि विजय कवळेकर हे पोलिसांना चकवा देत फरार झाले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

तसेच, दुसऱ्या एका कारवाईत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जांबोटी मार्गावरील मच्छे गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री करणाऱ्या संदेश ईरप्पा नाईक याला अटक केली आहे. या यशस्वी कारवायांबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संबंधित पोलीस पथकांचे कौतुक केले आहे.