बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना पोलिसांकडून पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीनुसार पाच लाख रुपयांचा बाँड तसेच प्रत्येकी पाच लाख रुपयांचे दोन जामीनदार सादर करून पोलिस उपायुक्तांसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नोटीस १२ जून रोजी जारी करण्यात आली आहे. दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २२ जून रोजी बेळगाव येथे कन्नड सक्तीविरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत शुभम शेळके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भाषिक हक्कांशी संबंधित प्रश्न तसेच कन्नड सक्तीविरोधातील भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील विविध भागांत पत्रके वाटप करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे आगामी आंदोलनाची भूमिका आणि उद्दिष्टे नागरिकांसमोर मांडण्यात आली.
शेळके यांच्या या सहभागानंतर पोलिसांकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, २२ जून रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








