• कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर
  • सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवारी यरमाळ जवळील जाधव फार्महाऊस येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण गावाने नव्या कार्यकारिणीला एकमुखी पाठिंबा दर्शविला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी येळ्ळूर गाव अधिक संघटित करण्याची गरज अधोरेखित केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी मोर्चामध्ये येळ्ळूरमधून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत चर्चा झाली.

सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी येळ्ळूर गावाने नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. यापुढेही गाव संघटित ठेवून समितीच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

समितीच्या पुनर्रचनेसाठी गठित करण्यात आलेल्या १६ सदस्यीय समितीने नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, उपाध्यक्षपदी राजू पावले व प्रदीप देसाई, सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर, उपसेक्रेटरीपदी बी. एन. मजुकर व उदय जाधव, तर खजिनदारपदी सतीश शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. उपखजिनदार म्हणून नागेंद्र पाखरे व डॉ. विवेक मेणसे यांची नियुक्ती करण्यात आली. हिशोब तपासणी समितीवर अनिल हुंदरे, सतीश मल्हारी देसूरकर व प्रा. सी. एम. गोरल यांची निवड करण्यात आली.

याशिवाय विविध पदांवर २१ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी समितीचे दिवंगत नेते व कार्यकर्त्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत उदय जाधव, अनिल हुंदरे व डी. जी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. दत्ता उघाडे यांनी आभार मानले.

या बैठकीला विविध सामाजिक, शैक्षणिक व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नव्या कार्यकारिणीमुळे येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला नवसंजीवनी मिळेल आणि सीमा प्रश्नाच्या लढ्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.