बेळगाव : बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या २६ व्या ज्युनिअर नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत बेळगावच्या दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरूतेकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. ५० मीटर आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तिने प्रथम क्रमांक मिळवत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आरोहीच्या या यशाबद्दल शनिवारी (दि. १४) डॉल्फिन स्विमिंग ग्रुपच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
उपस्थितांनी आरोहीच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत भविष्यातही ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी डॉल्फिन स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.








