• १९ जूनपासून हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार नाही
  • १५ ते २१ जूनदरम्यान विशेष जनजागृती अभियान

बेळगाव : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बेळगाव शहर पोलिसांनी “नो हेल्मेट; नो पेट्रोल” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत १९ जूनपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन देण्यात येणार नाही.

शहरातील प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा आणि सुरक्षित प्रवासाची सवय अंगीकारावी, या उद्देशाने १५ ते २१ जून या कालावधीत विशेष हेल्मेट जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून “नो हेल्मेट; नो पेट्रोल” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक आणि मालकांना पत्र पाठवून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १९ जूनपासून शहरातील पेट्रोल पंपांवर “हेल्मेट धारण केल्याशिवाय इंधन मिळणार नाही” असे फलक लावण्यात येणार असून, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम केवळ दंडात्मक कारवाईसाठी नसून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आणि रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.