- बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून एकाला अटक
- १६.९ लाखांचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १६.९ लाख रुपये किमतीचे चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
मंडोळी रोडवरील भवानी नगर येथील रहिवासी रोहन जाधव यांनी त्यांच्या घरातून सोने व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान भोवी गल्ली येथील निलेश भरमा सुतार (वय ४१) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने भवानी नगरमधील घरफोडीसह मच्छे गावातील गंगा गल्ली येथील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मच्छे येथील एका सराफाच्या दुकानातूनही दागिने चोरल्याचे त्याने कबूल केले.
आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी सुमारे ४५ ग्रॅम वजनाचे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे ४.१७८ किलो वजनाचे १०.९ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १६.९ लाख रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.








