- राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि ठाकरे शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
बेळगाव : तालुक्यातील सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील २३० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यासाठी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी राजश्री अॅग्रीव्हेंचर संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, अॅड. प्रशांत पवार, प्रदीप सुतार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक ओ. एन. मादार, एम. आर. कोवाडकर, एच. एन. पावले, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एन. मुतगेकर यांनी केले.








