• पोलिसांसह कर्जदारांवर गंभीर आरोप

गोकाक : बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील बेंडिगेरी गावात एका तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्जदारांची नावे नमूद करत गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जदारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून पोलिसांकडूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

मृताचे नाव रवींद्र दानव्वागोळ असे असून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पूजारी यांच्याकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम परत मागितल्यानंतर संबंधितांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच पीएसआय आनंद आणि तत्कालीन डीवायएसपी मुल्ला यांच्याकडूनही अन्याय झाल्याचा आरोप रवींद्र यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच मूडलगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून आत्महत्येच्या पत्रातील आरोप, त्याची सत्यता आणि संबंधित परिस्थितीचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.