• महापालिकेची धडक कारवाई ; रस्ते मोकळे – वाहतूक सुरळीत

बेळगाव : शहरातील वर्दळीच्या गणपत गल्ली परिसरात बेळगाव महापालिकेने शनिवारी सकाळी अतिक्रमणाविरोधात पुन्हा धडक मोहीम राबवत रस्ते मोकळे केले. रहदारी पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

बेळगावमधील प्रमुख व्यापारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत गल्लीत दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते. मात्र काही फेरीवाले आणि दुकानदारांनी रस्त्यावर स्टॉल, हातगाड्या तसेच विविध साहित्य ठेवून अतिक्रमण केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.

शनिवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अचानक परिसरात दाखल झाले. सुरुवातीला विक्रेत्यांना समज देत स्वखुशीने अतिक्रमण हटवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतरही रस्त्यावर ठेवलेले टेबल, फळ-भाजीपाला गाड्या, प्लास्टिक साहित्य आणि इतर अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काही ठिकाणी कारवाईला विरोध झाल्याने संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना नियमानुसार परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास दंडात्मक कारवाईसह कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला.

महापालिकेच्या या मोहिमेनंतर गणपत गल्लीतील वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.