• ग्रामपंचायत पीडीओंना दिले निवेदन
  • गटार सफाई, स्मशानभूमी सुधारणा व पाणीपुरवठ्याची मागणी

येळ्ळूर : समाज सारथी सेवा संघ यांच्या वतीने गावातील विविध नागरी समस्यांबाबत येळ्ळूर ग्रामपंचायत पीडीओ पूनम गडगे यांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता, स्मशानभूमी सुधारणा, नाला सफाई, डास निर्मूलन फवारणी तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीसह गावातील अनेक भागांतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी गेल्या पाच ते सात वर्षांत साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गटारी तुंबून पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येते आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उपनगरांतील गटारी गवत व झुडपांनी बंद झाल्याने सांडपाणी थेट शेतांमध्ये जाऊन शेतीचे नुकसान होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गावातील मुख्य स्मशानभूमीसह विविध समाजांच्या स्मशानभूमींमध्ये शेगड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढवावी, नवीन शेड उभारावीत आणि विद्यमान शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच जे. जे. एम. योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अपुरा असून तो सुरळीत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

लक्ष्मी तलाव परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या घरांपर्यंत पोहोचल्या असून त्याखालून वीजतारा गेल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केईबी आणि वन विभागाशी समन्वय साधून त्या हटवाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी पीडीओ पूनम गडगे यांनी पावसाळ्यापूर्वी नाले व गटारी साफ करण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगितले. डास निर्मूलनासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जे. जे. एम. योजनेतील त्रुटींबाबत संबंधित विभाग व जिल्हा परिषदेला पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सी. एम. गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, शिवाजी सायनेकर, हणमंत पाटील, डॉ. पावले, सुरज गोरल, हणमंत कुगजी, राजू पावले, गोविंद काळसेकर, परशराम बिजगरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.