- पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन
बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे बैठक पार पडली.पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह शहरातील धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी,व्यापारी संघटना तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोरसे यांनी नागरिकांना सण शांततेत बंधुभावाने आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. कोणतेही प्रकारच्या अफवा, चुकीचे संदेश किंवा सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडककारवाई करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
सणाच्या काळात शहरातील संवेदनशील विभागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे देखरेख वाढवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही यावेळी सांगितले.धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधनण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.








