बेळगाव : येत्या २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनातील ‘लोकनेते कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाणी घाडी यांच्याहस्ते होणार आहे.
या संमेलनाची निमंत्रण पत्रिका नुकतीच परशराम जोगाणी घाडी यांना परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील आणि खजिनदार एम. वाय. घाडी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.
प्रसाद होमिओपॅथी फार्मसीचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या परशराम जोगाणी घाडी यांनी एलआयसी क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, गरजूंना मदत, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्य करणे यामुळे ते बेळगावात सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
निमंत्रण स्वीकारताना श्री. घाडी यांनी सीमाभागात मराठी साहित्य व संस्कृतीचा जागर कायम ठेवणाऱ्या या संमेलनाशी जोडले जाणे हा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. तसेच कै. अजितदादा पवार यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहाच्या उद्घाटनाची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनाच्या तयारीची माहिती दिली. संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी केले.







