बेळगाव : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित ‘संगीत आशा’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार दि. २४ रोजी सायंकाळी ५ वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित केला आहे.

नितीन कपिलेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रा. दत्ता नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि मराठी भाषाप्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका संगीता बांदेकर-कुलकर्णी आपल्या सुरेल आवाजात आशा भोसले यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींना सदाबहार गीतांचा आनंद अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. मात्र, सभागृहातील पहिल्या पाच रांगा निमंत्रित आणि विशेष अतिथींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अविनाश कुलकर्णी, नीता कुलकर्णी, कुमार पाटील आदी उपस्थित होते.