• जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा
  • मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलनाचा निर्णय

बेळगाव : सीमाभागात कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक भाषावाद उकरून काढला जात असून मराठी भाषिकांना डिवचण्याचे प्रकार वाढत आहेत. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत सीमाप्रश्न, मराठी भाषिकांवरील अन्याय आणि पुढील आंदोलनात्मक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी विविध ठरावांची माहिती दिली. सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय आणि कन्नड संघटनांच्या वाढत्या कुरघोड्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

येत्या १ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच ३० मेपर्यंत सर्व घटक समित्यांच्या बैठका घेऊन मोर्चाची अंतिम तारीख निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र सरकार दाखवत असलेल्या उदासीनतेवरही बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची एकही बैठक झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच सीमावासीयांना भेटीसाठी वेळ न दिल्याने येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाचाही संदर्भ देण्यात आला. बेळगावमध्ये २० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने सर्व सरकारी परिपत्रके मराठीत देण्याची शिफारस आयोगाने केल्याचे नमूद करण्यात आले. या अहवालाची अंमलबजावणी करून संसदेमार्फत सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटक सरकारकडून कन्नड संघटनांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल, त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीने आंदोलन उभारेल, असा इशारा प्रकाश मरगाळे यांनी दिला.

महापालिकेत सीमाप्रश्नाविरोधी ठराव मांडण्याच्या हालचाली सुरू असताना समितीने अधिक आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून बैठकीत करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी कोणतेही आंदोलन करण्यापूर्वी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मतानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

बैठकीला प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, मालोजीराव अष्टेकर, गोपाळराव पाटील, अमर येळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. सी. मोदगेकर, एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील, अजित पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.