बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तसेच अत्याचार आणि फसवणुकीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बड्या व्यक्तींकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील एका महिलेला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. रेणमा मुतगा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्यावर रौडी शिटरची कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात पोलिसांसह अनेक नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून ब्लॅकमेल केल्याचे या महिलेविरोधातील तपासात उघड झाले आहे. एका पोलीस निरीक्षकाला लाचखोरीच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याचा कट तिने रचल्याचे समोर आले असून, फॉरेन्सिक तपासणीत या प्रकरणातील धक्कादायक बाबी स्पष्ट झाल्या आहेत.
उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ यांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीत, २०१२ ते २०२५ या कालावधीत रेणमा मुतगा हिने विविध पोलीस ठाण्यांत लग्न, फसवणूक आणि बलात्कारासंदर्भातील पाचहून अधिक खोटे गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून संबंधित व्यक्तींना धमकावून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारी प्रकारामागे एका मोठ्या टोळीचा हात असल्याचा संशय आहे. पोलीस कर्मचारी तसेच निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीला कायदेशीर आणि आर्थिक मदत करणाऱ्या सूत्रधारांचाही शोध सुरू आहे.
या प्रकरणातील सर्व संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.








