बेळगाव : शासनाने सोपवलेले महत्त्वाचे जनगणनेचे काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात महापालिकेला यश आले आहे. निर्धारित वेळेच्या सुमारे आठवडा आधी हे काम पूर्ण केल्याबद्दल मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवारी जनगणना प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

महापालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त कार्तिक एम. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. जनगणना, निवडणुका, पल्स पोलिओ मोहीम तसेच कोरोना काळात मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रशासनातील सैनिकांप्रमाणे जबाबदारी पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. हीदेखील एक प्रकारची देशसेवाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनगणना मोहिमेदरम्यान तांत्रिक अडचणी आणि कडक उन्हाचा सामना करत अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सहकार्याने अल्पावधीत काम पूर्ण केले. त्यांच्या मेहनतीमुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचे आयुक्तांनी सांगितले.

या उपक्रमात सुमारे एक हजार कर्मचारी आणि १५० मतदान कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण १२०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनगणनेचे काम पार पडले. यासाठी आठ ब्लॉक तयार करण्यात आले होते. तसेच ५० सदस्यांची स्वतंत्र तुकडी स्थापन करून सात अधिकाऱ्यांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. सात प्रभारी अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त (महसूल) डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी आयुक्तांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची योग्य नियुक्ती यामुळे हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रशासकीय विभागाचे उपआयुक्त उदयकुमार तळवार उपस्थित होते.