- १२ हून अधिक नागरिक जखमी ; दुचाकींचेही नुकसान
बेळगाव : शहापूर परिसरातील जेड गल्ली, अळवण गल्ली आणि आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ हून अधिक नागरिक जखमी झाले असून अनेक दुचाकींचेही नुकसान झाले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, सुमारे सात कुत्र्यांचा एक कळप अचानक आक्रमक बनला असून रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर हल्ले करत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी शांत असलेली ही कुत्री गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली आहेत.
कुत्र्यांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींच्या सीट कव्हरचेही नुकसान केले जात आहे. शुक्रवारी सकाळी जेड गल्लीत उभ्या असलेल्या तीन दुचाकींच्या सीट कुशन फाडण्यात आल्याची घटना घडली.
स्थानिक रहिवासी जॉर्ज रॉड्रिग्ज हे देखील या हल्ल्याचे बळी ठरले. घरासमोर दुचाकी पार्क करत असताना एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. “मी नेहमी या कुत्र्यांशी प्रेमाने वागतो, मात्र त्यांची अचानक वाढलेली आक्रमकता धक्कादायक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हल्ल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या सीटचेही नुकसान करण्यात आले.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बेळगाव महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. नगरसेवक जयंत जाधव यांनी सांगितले की, महापालिकेचे पथक अनेकदा कुत्र्यांना पकडण्यासाठी आले होते, मात्र पथक येताच कुत्री पसार होत आहेत. प्रशासनाकडून लवकरच ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.








