- गोडेसे कुटुंब व युवा समिती सीमाभागचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
- दुर्घटनेनंतर वेधले प्रशासनाचे लक्ष
बेळगाव : कपिलेश्वर तलाव परिसरात भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तलावाचा ताबा तात्काळ महापालिकेकडे देऊन त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
या संदर्भात जमीनमालक गोडेसे कुटुंब, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व स्थानिक नागरिकांनी मंगळवारी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांची भेट घेत निवेदन सादर केले. तलावाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तलाव दुर्घटनेमागील कारणे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. गोडेसे कुटुंब आणि महापालिका यांच्यातील हस्तांतरण प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळेच ही दुर्घटना घडल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
निवेदन स्वीकारून प्रादेशिक आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विकास कलघटगी, कपिल भोसले आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.








