- पोलिसांचे विशेष पथक कार्यरत
बेळगाव : हिंडलगा कारागृहात मोबाईल फोनच्या अवैध वापराच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस सतर्क झाले असून या प्रकरणांचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
गेल्या दीड वर्षात तुरुंगात मोबाईल वापराशी संबंधित १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस तांत्रिक पुरावे गोळा करत असून कारागृहातील बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.
तपासादरम्यान कुख्यात आरोपी जयेश पुजारी याचे नाव समोर आले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत त्याने तब्बल २८ मोबाईल फोन वापरल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तुरुंगातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे या तपासाला आणखी एक वळण लागले आहे. एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनाने तक्रार दाखल केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कारागृहातील बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असून पुढील तपास सुरू आहे.








